YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 17:1-14

नीतिसूत्रे 17:1-14 MARVBSI

एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा. शहाणा सेवक लज्जा आणणार्‍या मुलावर हुकमत चालवील, व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल. रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो. दुष्कर्मी मनुष्य दुष्ट वाणी लक्ष देऊन ऐकतो; लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो. जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्‍याचा अवमान करतो; जो दुसर्‍याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही; पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत; उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही; मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल? घेणार्‍याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मोलवान आहे; ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते ते तो चातुर्याने करतो. जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात. वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत. फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याच्याकडे निर्दय जासूद पाठवण्यात येईल. जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो. जो बर्‍याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.