YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 14:1-18

नीतिसूत्रे 14:1-18 MARVBSI

प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानतो. मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते. बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते. विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो. निंदक ज्ञानाचा शोध करतो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते. मूर्ख मनुष्याच्या वार्‍यास जाऊ नकोस, कारण त्याच्या ठायी तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही. शहाण्याने आपला मार्ग जाणणे ह्यात त्याची सुज्ञता असते. पण मूढांची मूढता कपटरूप होय. मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळ जनांत परस्पर प्रेमभाव असतो. हृदयाला आपल्या ठायीच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येववत नाही. दुर्जनांचे घर कोसळते, सरळांचा तंबू चांगला राहतो. मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात. हसतानादेखील हृदय खिन्न असते, आणि हर्षाचा शेवट दु:खात होतो. भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो; शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्‍याचा लोक द्वेष करतात. भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.