नीतिसूत्रे 14:1-18
नीतिसूत्रे 14:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानतो. मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते. बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते. विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो. निंदक ज्ञानाचा शोध करतो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते. मूर्ख मनुष्याच्या वार्यास जाऊ नकोस, कारण त्याच्या ठायी तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही. शहाण्याने आपला मार्ग जाणणे ह्यात त्याची सुज्ञता असते. पण मूढांची मूढता कपटरूप होय. मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळ जनांत परस्पर प्रेमभाव असतो. हृदयाला आपल्या ठायीच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येववत नाही. दुर्जनांचे घर कोसळते, सरळांचा तंबू चांगला राहतो. मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात. हसतानादेखील हृदय खिन्न असते, आणि हर्षाचा शेवट दु:खात होतो. भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो; शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्याचा लोक द्वेष करतात. भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.
नीतिसूत्रे 14:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो. मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते. गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते. विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो. निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे. मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही. शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे. मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते. हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही. दुष्टाच्या घराचा नाश होईल, पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल. मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो. हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो. जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल. भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो. शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही. शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो. भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात.
नीतिसूत्रे 14:1-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते. जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो. मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात. जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो, परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो. खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही, परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात. टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही, परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते. मूर्खापासून दूर राहा; त्यांच्या बोलण्यातून तुला ज्ञान मिळणार नाही. सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, पण मूर्खाची मूर्खता धोका आहे. मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात. प्रत्येक अंतःकरणाला स्वतःचे दुःख माहीत असते; आणि इतर कोणीही त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही. दुष्टांचे घर नाश केले जाईल, परंतु नीतिमानाचा तंबू समृद्ध होईल. एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो. हसत असतानाही हृदयात वेदना असू शकते, उल्हासाचा अंत दुःखातही होऊ शकतो. विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील, तसेच चांगल्या माणसांना त्यांच्या चांगुलपणाची. साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो. सुज्ञ मनुष्य याहवेहचे भय बाळगतो आणि वाईटापासून दूर राहतो. परंतु मूर्ख तापट डोक्याचा आहे आणि तरीही त्याला सुरक्षित वाटते. तापट मनुष्य मूर्खपणाच्या गोष्टी करतो, आणि दुष्टसंकल्पांची योजना करणाऱ्याचा तिरस्कार केला जाईल. साध्याभोळ्याला मूर्खपणाचा वारसा मिळतो, तर सुज्ञाला सुज्ञतेचा मुकुट मिळतो.