YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 11:1-15

नीतिसूत्रे 11:1-15 MARVBSI

खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे. गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते. सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते. सात्त्विकाची नीतिमत्ता त्याचा मार्ग नीट करते, पण दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावेल. सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील. दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरवसा नाहीसा होईल. नीतिमान संकटांतून मुक्त होतो, आणि त्याच्या जागी दुर्जन सापडतो. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजार्‍याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. नीतिमानांचे कुशल असते तेव्हा नगर उल्लास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो, सरळांच्या आशीर्वादाने नगराची उन्नती होते, पण दुर्जनांच्या मुखाने त्याचा विध्वंस होतो. जो आपल्या शेजार्‍याला तुच्छ मानतो तो बुद्धिशून्य होय, पण सुज्ञ मनुष्य मौन धारण करतो. लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो, पण जो निष्ठावान असतो तो गोष्ट गुप्त ठेवतो. शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अध:पात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते. परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणार्‍यांचा ज्याला तिटकारा आहे तो निर्भय राहतो.