फिलिप्पैकरांस पत्र 4
4
सद्बोध
1म्हणून प्रियजनहो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
2मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा.
3आणि तसेच हे माझ्या खर्या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.
4प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.
5तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे.
6कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
7म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
8बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.
9माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत, व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.
फिलिप्पैकरांच्या ममताळूपणाबद्दल पौल कृतज्ञ
10मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होता; पण तुम्हांला संधी नव्हती.
11मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे.
12दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे.
13मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.
14तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत.
15फिलिप्पैकरांनो, तुम्हांलाही ठाऊक आहे की, सुवार्तेच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्यावाचून दुसर्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही;
16कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली.
17मी दानाची अपेक्षा करतो असे नाही; तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो.
18मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे.
19माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील.
20आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
समारोप
21ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात.
22सर्व पवित्र जन व विशेषेकरून कैसराच्या घरचे तुम्हांला सलाम सांगतात.
23प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
सध्या निवडलेले:
फिलिप्पैकरांस पत्र 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.