गणना 32
32
रऊबेन, गाद व अर्धे मनश्शेचे घराणे यार्देनेच्या पूर्वेस वस्ती करतात
(अनु. 3:12-22)
1रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.
2म्हणून गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सरदार ह्यांच्याकडे येऊन म्हणाले,
3“अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन 4ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या मंडळीसमक्ष पादाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.”
5ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस.”
6गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय?
7जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता? 8तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले.
9त्यांनी अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्राएल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन त्यांनी निरुत्साही केले.
10त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली की,
11‘मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे आहेत त्यांतील कोणीही अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो देश पाहणार नाहीत, कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत;
12कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत.’
13परमेश्वराचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात चाळीस वर्षे भटकायला लावले.
14आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात.
15तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.”
16मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, “आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे वसवू;
17तरी इस्राएल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वत: हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू; मात्र आमची मुलेबाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील.
18इस्राएल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही.
19आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनेच्या पैलतीरी किंवा त्यांच्याही पलीकडे वतन घेणार नाही; कारण यार्देनेच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हांला मिळाला आहे.”
20तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही ही गोष्ट कराल, म्हणजे जर तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल,
21आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून हाकून देईपर्यंत यार्देनेपलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल,
22तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हांला परत येता येईल आणि परमेश्वराच्या व इस्राएलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल, आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल.
23असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा.
24तर तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी नगरे वसवा आणि आपल्या शेरडामेंढरांसाठी वाडे बांधा; आणि तुम्ही शब्द दिला तो पाळा.”
25तेव्हा गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले, “स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील.
26आमची मुलेबाळे, स्त्रिया, शेरडेमेंढरे व गुरेढोरे गिलादातील नगरात राहतील;
27पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करायला पलीकडे जाईल.”
28तेव्हा मोशेने एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वंशांच्या वाडवडिलांच्या घराण्यातले प्रमुख ह्यांना त्यांच्यासंबंधाने आज्ञा केली.
29मोशे त्यांना म्हणाला, “जर गादाच्या व रऊबेनाच्या वंशजांतील प्रत्येक पुरुष सशस्त्र होऊन तुमच्याबरोबर परमेश्वरापुढे यार्देनेपलीकडे गेला व देश तुमच्या ताब्यात आला, तर तुम्ही त्यांना गिलाद प्रदेश वतन करून द्यावा;
30पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे.”
31तेव्हा गादाच्या वंशजांनी व रऊबेनाच्या वंशजांनी उत्तर दिले की, “परमेश्वराने आम्हा तुझ्या दासांना सांगितले तसे आम्ही करू.
32आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे.”
33मग मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याचा अर्धा वंश ह्यांना अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे अर्धे राज्य दिले; म्हणजे देश, नगरे व त्यांच्या आजूबाजूची भूमी, अर्थात देशातली चोहोबाजूंची नगरे दिली.
34गादाच्या वंशजांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
35अटारोथ-शोफान, याजेर, यागबहा,
36बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही नगरे तटबंदी केली; आणि शेरडामेंढरांसाठी वाडे केले.
37रऊबेनाच्या वंशजांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम,
38आणि मूळची नबो व बाल-मौन (ह्यांची नावे बदलून) व सिब्मा ही नगरे वसवली आणि त्यांनी वसवलेल्या नगरांना निरनिराळी नावे दिली.
39मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांनी गिलाद प्रदेश काबीज केला आणि तेथे राहणार्या अमोरी लोकांना घालवून दिले.
40तेव्हा मोशेने मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांना गिलाद प्रदेश दिला आणि ते तेथे राहू लागले.
41आणि मनश्शेचा वंशज याईर ह्याने अमोर्यांची खेडी काबीज केली आणि त्यांना हव्वोथ-याईर (याइराची खेडी) हे नाव दिले.
42नोबह ह्याने कनाथ व त्याच्या आसपासची खेडी काबीज केली आणि त्यांना नोबह हे आपले नाव दिले.
सध्या निवडलेले:
गणना 32: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.