YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 32:1-15

गणना 32:1-15 MARVBSI

रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले. म्हणून गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सरदार ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या मंडळीसमक्ष पादाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.” ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस.” गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय? जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता? तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले. त्यांनी अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्राएल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन त्यांनी निरुत्साही केले. त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली की, ‘मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे आहेत त्यांतील कोणीही अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो देश पाहणार नाहीत, कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत; कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत.’ परमेश्वराचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात चाळीस वर्षे भटकायला लावले. आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात. तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.”