गणना 30
30
स्त्रियांनी केलेल्या नवसांसंबंधी नियम
1मोशे इस्राएल लोकांच्या वंशप्रमुखांना म्हणाला, “परमेश्वराने दिलेली आज्ञा ही :
2एखाद्या पुरुषाने परमेश्वराला नवस केला अथवा आपण व्रतबद्ध होण्याची शपथ वाहिली तर त्याने आपली शपथ मोडू नये; जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे.
3त्याचप्रमाणे एखादी स्त्री तरुणपणात आपल्या बापाच्या घरी असताना परमेश्वराला नवस करून व्रतबद्ध झाली असेल, 4आणि तिचा नवस आणि ज्या वचनाने ती व्रतबद्ध झाली ते ऐकून तिचा बाप काही बोलला नसेल, तर तिचे सर्व नवस कायम राहतील, आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.
5पण ते ऐकून तिच्या बापाने तिला मनाई केली तर तिचे नवस किंवा ज्या कोणत्याही बंधनाने तिने आपणास बद्ध करून घेतले असेल त्यांपैकी कोणतेही कायम राहणार नाही; तिच्या बापाने तिला मनाई केली म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
6तिने नवस केल्यावर किंवा ती अविचाराने व्रतबद्ध झाल्यावर तिचा विवाह झाला, 7आणि तिच्या नवसाविषयी ऐकून तिचा पती काही बोलला नाही, तर तिचे नवस कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.
8पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली, तर तिने केलेले नवस आणि अविचाराने ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती रद्द ठरतील; आणि परमेश्वर तिला क्षमा करील.
9विधवेने किंवा टाकलेल्या स्त्रीने काही नवस केले तर ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती कायम राहतील.
10एखाद्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असताना नवस केला अथवा शपथेने स्वतःला बद्ध करून घेतले,
11व तिचा पती ते ऐकून काही बोलला नाही व त्याने तिला मनाई केली नाही, तर तिचे सर्व नवस कायम राहतील व ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.
12पण नवर्याने ती ऐकली त्याच दिवशी ती रद्द केली, तर तिच्या तोंडून जे नवस अथवा तिला बद्ध करणारी जी वचने निघाली असतील ती रद्द होतील; तिच्या नवर्याने ती रद्द केली आहेत म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
13तिचा कोणताही नवस किंवा जिवाला दंडन करणारे कोणतेही व्रत तिचा पती कायम करील किंवा रद्द करील.
14दिवसामागून दिवस जात असता तिचा पती तिला काही बोलत नाही, तर तो तिचे सर्व नवस आणि ज्या ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल ती कायम करतो; ती ऐकली त्याच दिवशी तो काही बोलत नाही, ह्यावरून त्याने ती कायम केली आहेत असे समजावे.
15पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधाची शिक्षा त्याने भोगावी.”
16पतिपत्नीसंबंधीच्या आणि पिता व त्याच्या घरी राहणारी त्याची अविवाहित कन्या ह्यांच्या संबंधीच्या ज्या विधींविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली ते हे विधी होत.
सध्या निवडलेले:
गणना 30: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.