YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 22:1-14

गणना 22:1-14 MARVBSI

मग इस्राएल लोकांनी कूच करून यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला. इस्राएलांनी अमोर्‍यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले. इस्राएल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला; इस्राएल लोकांमुळे तो हवालदिल झाला. तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले, “बैल जसा शेतातील गवत फस्त करतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्वकाही फस्त करील.” त्या वेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता. बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात, फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळवले की, “पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत; म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे; कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत; तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन; कारण मला ठाऊक आहे की, ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो.” मग मवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे वस्तीस राहा; परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हांला उत्तर देईन;” तेव्हा मवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत?” बलामाने देवाला उत्तर दिले, “मवाबाचा राजा, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठवला आहे की, ‘पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे; तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे; तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल.”’ देव बलामास म्हणाला, “तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.” सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे.” तेव्हा मवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की, “बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही.”