परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. नंतर इस्राएल लोकांनी कूच करून ओबोथ येथे तळ दिला. ओबोथाहून कूच करून उगवतीकडे मवाबासमोरील रानात ईये-अबारीम येथे त्यांनी तळ दिला. तेथून कूच करून त्यांनी जेरेद खोर्यात तळ दिला. तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी, अमोर्यांच्या सीमेवरून वाहणारी जी आर्णोन नदी तिच्या पैलतीरी तळ दिला. ही आर्णोन नदी मबाव देशाची सरहद्द आहे. ती मवाबी व अमोरी ह्यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते. ह्यामुळे ‘परमेश्वराचे संग्राम’ नावाच्या ग्रंथात येणेप्रमाणे लिहिले आहे : “सुफातला वाहेब, व आर्णोनेची खोरी आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत गेलेली त्या खोर्यांची उतरण.” तेथून कूच करून ते बएर (म्हणजे विहीर) येथे गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, ‘लोकांना एकत्र कर म्हणजे मी त्यांना पाणी देईन’ तीच ही विहीर. त्या समयी इस्राएलाने हे गीत गाइले : “हे विहिरी, उसळून ये; तिला उद्देशून गा. राजदंडाने1 व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली इस्राएलातील अमिरांनी ती खोदली.” मग ते रानातून मत्तनाला गेले; आणि मत्तनाहून नाहालीयेलास आणि नाहालीयेलाहून बामोथास गेले; आणि बामोथाहून कूच करून रानापुढील (येशीमोनापुढील) पिसगाच्या माथ्याजवळ असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोर्याकडे ते जाऊन पोहचले. मग इस्राएलाने अमोर्यांचा राजा सीहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे. आम्ही आजूबाजूला वळून कोणत्याही शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही, आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच जाऊ.” पण सीहोनाने इस्राएलास आपल्या देशातून जाऊ दिले नाही. आपले सर्व लोक जमा करून इस्राएलाशी सामना करण्यासाठी तो निघाला आणि रानाकडे आला; त्याने याहस येथे येऊन इस्राएलाशी लढाई केली. तेव्हा इस्राएलाने त्याच्यावर तलवार चालवली आणि आर्णोनेपासून अम्मोनी लोकांच्या सरहद्दीवरील यब्बोक नदीपर्यंत त्याचा देश काबीज केला; परंतु अम्मोनी लोकांची सरहद्द मजबूत होती. ह्याप्रमाणे इस्राएलाने अमोर्यांची ही सर्व नगरे घेतली. अमोर्यांच्या सर्व नगरांत म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावांत इस्राएल वस्ती करून राहिला. हेशबोन हे अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे नगर होते; त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्णोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता. ह्यावरून शाहीर गातात की, “हेशबोनाला या; सीहोनाचे नगर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या; कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे. सीहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे; तिने मवाबाचे आर, आणि आर्णोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकले आहेत. हे मवाबा! तू हायहाय करशील; कमोशाचे लोकहो तुम्ही नष्ट झालात, त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले, आणि आपल्या कन्या अमोर्यांचा राजा सीहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत. आम्ही त्यांना बाण मारले आहेत; दीबोनापर्यंत हेशबोनाचा नाश झाला आहे, आणि नोफापर्यंत सर्व देश आम्ही उजाड केल्यावर मेदबापर्यंत आग पसरली आहे.” ह्याप्रमाणे इस्राएल लोक अमोर्यांच्या देशात वस्ती करून राहिले. मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्यांना देशाबाहेर हाकून लावले. नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले, तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करायला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रई येथे युद्धास उभा राहिला. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला, त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे. हेशबोनात राहणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे जसे तू केलेस तसेच ह्याचेही कर.” मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला.
गणना 21 वाचा
ऐका गणना 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 21:8-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ