YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 20:1-13

गणना 20:1-13 MARVBSI

पहिल्या महिन्यात इस्राएल लोकांची सर्व मंडळी त्सीन रानात आली; त्यांनी कादेश येथे मुक्काम केला; तेथे मिर्याम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठमाती दिली. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, “परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते! तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून? मिसर देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणीसुद्धा नाही.” तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळीपुढून निघून दर्शनमंडपाच्या दाराशी पालथे पडले, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आपली काठी घे. तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज.” परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्यासमोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले, आणि त्यांना मोशे म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढायचे काय?” मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.” त्या झर्‍याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.