गणना 15
15
अर्पणांविषयी नियम
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला तुमच्या वस्तीसाठी देऊ केलेल्या देशाला तुम्ही जाऊन पोहचाल;
3आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो, 4यज्ञ करणार्याने परमेश्वराप्रीत्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी एक चतुर्थांश हिनभर तेलात मळलेल्या एक दशांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे;
5आणि एक चतुर्थांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तयार करावे.
6अन्नार्पण म्हणून दर मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.
7परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतीयांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस.
8तू परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोर्हा अर्पण करशील, 9तेव्हा अर्पण करणार्याने गोर्ह्याबरोबर अर्धा हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
10परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून अर्धा हिन द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस.
11प्रत्येक गोर्ह्यासह, प्रत्येक मेंढ्यासह, प्रत्येक कोकरासह व प्रत्येक करडासह वर सांगितल्याप्रमाणे अर्पण करावे.
12तुम्ही अर्पाल त्या यज्ञपशूंच्या संख्येप्रमाणे प्रत्येकासह त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही तसेच अर्पण तयार करावे.
13देशात जन्मलेल्या सर्वांनी परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य अर्पण करीत असताना असेच करावे.
14तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराप्रीत्यर्थ हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्याप्रमाणेच त्यानेही करावे.
15सर्व मंडळीसाठी म्हणजे तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयासाठी एकच विधी असावा. तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हांला हा निरंतरचा विधी होय; परमेश्वरापुढे जसे तुम्ही तसाच परदेशीयही होय.
16तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयासाठी एकच नियम व एकच रिवाज असावा.”
17परमेश्वर मोशेला म्हणाला,
18“इस्राएल लोकांना सांग : ज्या देशात मी तुम्हांला नेत आहे तेथे तुम्ही आल्यावर
19त्या देशातले अन्न खाल तेव्हा तुम्ही त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावा.
20मळलेल्या कणकेची पोळी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी.
21मळलेल्या कणकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानपिढ्या द्यावा.
22परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडली,
23म्हणजे परमेश्वर आज्ञा देऊ लागला त्या दिवसापासून पुढे तुमच्या पिढ्यानपिढ्या परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडली,
24आणि मंडळीला नकळत ही चूक घडली असली, तर सर्व मंडळीने परमेश्वराला सुवास यावा म्हणून एका गोर्ह्याचे होमार्पण करावे; नियमानुसार त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण करावे आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
25मग याजकाने इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांना क्षमा होईल; कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पण केला आहे.
26ह्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्या परदेशीयांनाही क्षमा होईल; कारण ह्या चुकीशी सर्व मंडळीचा संबंध होता.
27एखाद्या मनुष्याने चुकून पाप केले तर त्याने एक वर्षाची बकरी पापबली म्हणून अर्पावी.
28चुकून पाप करणार्यांसाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याला क्षमा होईल.
29चुकून काही कृत्य करणार्याच्या बाबतीत तुम्हांला एकच नियम असावा, मग तो इस्राएल लोकांतील स्वदेशीय असो किंवा त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परदेशीय असो.
30परंतु धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशीय असो किंवा परदेशीय असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा; त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
31त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानले व त्याची आज्ञा मोडली, म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा; त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्यानेच भोगावी.”
शब्बाथ मोडणार्यास धोंडमार
32इस्राएल लोक रानात राहत होते तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्बाथवारी लाकडे गोळा करीत असताना आढळला.
33ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी ह्यांच्याकडे घेऊन गेले.
34त्यांनी त्याला अटकेत ठेवले, कारण त्याचे काय करावे ह्याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते.
35तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या मनुष्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार करावा.”
36परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला व तो मेला.
वस्त्राच्या काठांना लावायचे गोंडे
37परमेश्वर मोशेला म्हणाला,
38“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या काठांना गोंडे लावावेत, आणि प्रत्येक काठाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी.
39ह्या गोंड्यांचा उद्देश असा की, ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हांला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्यात; आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आलात तसे वागू नये;
40तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्यात व आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र व्हावे.
41तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
सध्या निवडलेले:
गणना 15: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.