YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 14:11-25

गणना 14:11-25 MARVBSI

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत? मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.” मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस. आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील. ह्यांनी ऐकले आहे की, तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस; तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस. आता तू ह्या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील, ‘जो देश परमेश्वराने ह्या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना न्यायला तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकले.’ म्हणून मी विनवतो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे; तू म्हटलेच आहेस की, ‘परमेश्वर मंदक्रोध, दयेचा सागर, अन्याय व अपराध ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे; तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.’ तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू ह्या लोकांना क्षमा केलीस तशी ह्या वेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवतो.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे; आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही; म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडायचा नाही; ज्यांनी मला तुच्छ लेखले त्यांतले कोणीही तो देश पाहणार नाहीत. तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे, म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.”