YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 11:10-17

गणना 11:10-17 MARVBSI

सर्व कुटुंबांतील लोक आपापल्या तंबूंच्या दारांशी रडताना मोशेने ऐकले; व त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला; मोशेलाही वाईट वाटले. मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालत आहेस, ह्यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते; असे का? मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? ह्यांना मी प्रसवलो आहे काय? ‘जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहेस, त्या देशाकडे, तान्ह्या बाळाला सांभाळून नेणार्‍या पालक-पित्याप्रमाणे मी ह्यांना उराशी धरून घेऊन जावे’ असे तू मला कसे सांगतोस? ह्या सर्व लोकांना पुरवायला मी मांस कोठून आणू? कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहेत की, आम्हांला खायला मांस दे. मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही; ते मला फारच जड जात आहे. मला तू असेच वागवणार असलास तर मला एकदाचा मारून टाक; तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही.” परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या माहितीतले इस्राएल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जण निवडून त्यांना दर्शनमंडपाजवळ माझ्याकडे घेऊन ये. तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे. मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणार्‍या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.