YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 15:1-15

मार्क 15:1-15 MARVBSI

मग पहाट होताच वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.” मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवत होते. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, “काय? तू काही उत्तर देत नाहीस? पाहा, ते तुझ्यावर किती आरोप ठेवत आहेत.” तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; ह्यावरून पिलाताला आश्‍चर्य वाटले. सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर बांधून ठेवलेला बरब्बा नावाचा कोणीएक माणूस होता. लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्याकरता मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले. परंतु त्याला सोडण्याऐवजी ‘बरब्बाला आमच्यासाठी सोडा’ अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. तेव्हा पिलाताने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे?” “त्याला वधस्तंभावर खिळून टाका,” अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. पिलाताने त्यांना म्हटले, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” तेव्हा लोकसमुदायाला खूश करावे ह्या हेतूने पिलाताने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले, आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.