मार्क 15:1-15
मार्क 15:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पहाट होताच वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.” मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवत होते. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, “काय? तू काही उत्तर देत नाहीस? पाहा, ते तुझ्यावर किती आरोप ठेवत आहेत.” तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही; ह्यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर बांधून ठेवलेला बरब्बा नावाचा कोणीएक माणूस होता. लोकसमुदाय पुढे येऊन पिलाताला विनवू लागला की, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्याकरता मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले. परंतु त्याला सोडण्याऐवजी ‘बरब्बाला आमच्यासाठी सोडा’ अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. तेव्हा पिलाताने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे?” “त्याला वधस्तंभावर खिळून टाका,” अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. पिलाताने त्यांना म्हटले, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” तेव्हा लोकसमुदायाला खूश करावे ह्या हेतूने पिलाताने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले, आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.
मार्क 15:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले. पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.” मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले. मग पिलाताने त्यास पुन्हा प्रश्न विचारला, तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते कितीतरी गोष्टींविषयी तुझ्यावर आरोप करत आहेत! पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले. वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे. बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. त्याने दंगलीमध्ये खून केल्याबद्दल त्यास पकडण्यात आले होते. लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. पिलाताने विचारले, तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांस चिथवले. परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
मार्क 15:1-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रातःकाळ झाल्यावर सर्व प्रमुख याजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा, यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलात याच्या स्वाधीन केले. पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तू म्हटले तसे.” प्रमुख याजक आणि यहूदी पुढार्यांनी येशूंवर अनेक आरोप केले. म्हणून पिलाताने येशूंना विचारले, “तू त्यांना उत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर कितीतरी गोष्टींचा दोषारोप करीत आहे.” परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले. आता सणामध्ये एका कैद्याला लोकांच्या विनंतीप्रमाणे सोडून देण्याची प्रथा होती. बरब्बा म्हटलेला एक माणूस त्यावेळी बंडखोरांबरोबर तुरुंगात शिक्षा भोगत होता, त्याने उठाव करून खून केला होता. आता रितीप्रमाणे जसे तो करत होता तसे त्याने करावे अशी मागणी समुदाय पिलाताला करू लागला. “तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का?” पिलाताने विचारले, प्रमुख याजकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले हे पिलाताच्या लक्षात आले होते. पण तेवढ्यात येशूंच्या ऐवजी बरब्बाला सोडा अशी मागणी करण्यासाठी प्रमुख याजकांनी समुदायास पेटविले. पिलाताने विचारले, “ज्याला तुम्ही यहूद्यांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?” लोक ओरडून म्हणाले, “त्याला क्रूसावर खिळा!” “पण का?” पिलाताने खुलासा विचारला, “त्याने असा कोणता गुन्हा केला आहे?” पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला क्रूसावर खिळा!” लोकांना खुश करण्याच्या विचाराने, पिलाताने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना फटके मारल्यानंतर क्रूसावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले.
मार्क 15:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पहाट होताच वडीलजन व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलातच्या स्वाधीन केले. पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.” मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप करीत होते. पिलातने त्याला पुन्हा विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? पाहा, ते तुझ्यावर किती तरी आरोप करीत आहेत.” तरी येशूने काही उत्तर दिले नाही. पिलातला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत, त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. बंडात भाग घेणाऱ्यांतील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर अटक केलेला बरब्बा नावाचा एक माणूस होता. लोकसमुदाय पुढे येऊन पिलातला विनवू लागला, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्याकरता मी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?” मुख्य याजकांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे पिलात ओळखून होता. परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला सोडा, ही मागणी करायला मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. पिलातने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहुदी लोकांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?” “त्याला क्रुसावर खिळा”, अशी त्यांनी ओरड केली. पिलातने त्यांना म्हटले, “का? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” लोकसमुदायाला खुश करावे, ह्या हेतूने पिलातने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले आणि येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.