YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:18-27

मार्क 12:18-27 MARVBSI

मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले, “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘कोणाएकाचा भाऊ मेला, आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला. मग ती दुसर्‍याने केली; तोही संतती न होता मेला; आणि तशीच तिसर्‍याचीही गोष्ट झाली. ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना? कारण मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत; तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’ तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”