YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:1-12

मार्क 12:1-12 MARVBSI

मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्याभोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला, आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसर्‍या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले; त्याचे तर दगडांनी डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एका जणास पाठवले; त्याला तर त्यांनी जिवे मारले; आणि दुसर्‍या अनेकांना तसेच केले; म्हणजे त्यांच्यातील कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. ‘आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील’ असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की, ‘जो दगड बांधकाम करणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे’?” तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.