YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 6:5-18

मत्तय 6:5-18 MARVBSI

तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’] कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.