मत्तय 6:5-18
मत्तय 6:5-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी निरर्थक बडबड करू नका कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.) कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील; पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे. तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. यासाठी की, तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल.
मत्तय 6:5-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्ही प्रार्थना करताना ढोंग्यासारखे होऊ नका, रस्त्यांच्या कोपर्यात किंवा सभागृहांमध्ये उभे राहून, दुसर्यांना दिसावे म्हणून प्रार्थना करण्यास त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील. आणि तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा गैरयहूदी लोकांप्रमाणे निरर्थक बडबड करू नका, त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते. “तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो, तुमचे राज्य येवो, जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरही, तुमची इच्छा पूर्ण होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला द्या. आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा केली आहे, तशी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा करा. आणि आम्हास परीक्षेत आणू नका, परंतु त्या दुष्टापासून आम्हास सोडवा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वकाळ तुमचेच आहेत. आमेन’ ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील. पण जर तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. “तुम्ही उपास करता त्यावेळी, ढोंग्याप्रमाणे उदास चेहरा करू नका. आपण उपास करीत आहोत असे लोकांना दाखविण्यासाठी ते कोमेजलेल्या चेहर्यांनी वावरतात. मी तुम्हाला खरोखरच सांगतो की, त्यांचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे. तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, म्हणजे तुम्ही उपास करीत आहात असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील.
मत्तय 6:5-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’] कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.
मत्तय 6:5-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तसेच जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा ढोंग्यांसारखा वागू नकोस. लोकांनी त्यांना पाहावे म्हणून सभास्थानांत व चव्हाट्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा व दार लावून तुझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले ऐकले जाईल, असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत, हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणतो. तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेनर्.] जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखा तुमचा चेहरा खिन्न करू नका, कारण आपण उपवास करत आहोत, असे लोकांना दिसावे म्हणून ते मलूल चेहऱ्याने वावरतात. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू. अशासाठी की, तू उपवास करत आहेस, हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.