नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?”
त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.”
त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”
मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली;
आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”
त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील.
कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वत:च्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे असणार्यांत कोणी असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले.
आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते;
ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते.
तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले.
मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक;” हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते.
तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला; आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले.
तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा (प्रिय) ‘पुत्र’, ‘माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.”’
ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यांतले काहीच त्या दिवसांत त्यांनी कोणाला सांगितले नाही.