YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 9:18-26

लूक 9:18-26 MARVBSI

नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.” मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली; आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.” त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वत:च्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.

लूक 9 वाचा

ऐका लूक 9