YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 8:1-21

लूक 8:1-21 MARVBSI

पुढे लवकरच असे झाले की, तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता; तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित होते; आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती, आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत. तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला, “पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले; ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; ते उगवून शंभरपट पीक आले.” असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?” तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे; परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत; अशासाठी की, ‘त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.’ हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्‍वफळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही; तर आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा; ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.” त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले की, “तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”

लूक 8 वाचा

ऐका लूक 8