तेव्हा प्रभूने म्हटले, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत?
जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत; ती म्हणतात,
‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला,
तरी तुम्ही नाचला नाहीत;
आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही रडला नाहीत.’
बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे.
मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र!
परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.”
परूश्यांतील कोणीएकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली; आणि तो त्या परूश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला.
तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली;
आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.
तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”
तेव्हा येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरूजी, बोला.”
“एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते.
देणे फेडण्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांना ते सोडले. तर त्यांतून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?”
शिमोनाने उत्तर दिले, “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर ठरवलेस.”
तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले.
तुम्ही माझा मुका घेतला नाही; परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही.
तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही; परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले.
ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.”
मग त्याने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण?”
मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”