YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 7:1-17

लूक 7:1-17 MARVBSI

नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफर्णहूमास गेला. तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे; कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.” तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला; मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रांना पाठवून त्याला म्हटले, “प्रभूजी, श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही; ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही; तर शब्द मात्र बोला1 म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला ‘जा’ म्हटले म्हणजे तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले म्हणजे तो ते करतो.” ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्‍चर्य वाटले; आणि तो वळून आपल्यामागे चालणार्‍या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलातही आढळला नाही.” नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.” मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.” त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.

लूक 7 वाचा

ऐका लूक 7

संबंधित व्हिडिओ