मग एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले.
तेव्हा परूश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले,
तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”
नंतर दुसर्या एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता.
तेव्हा शास्त्री व परूशी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो शब्बाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहण्यास टपून राहिले.
परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, “ऊठ व मध्ये उभा राहा.” मग तो उठून उभा राहिला.
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”
मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात दुसर्या हातासारखाच पूर्ण बरा झाला.
मग त्यांचे डोके फिरले व येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसांत विचार करू लागले.
त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.
मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील बारा जणांना निवडून त्यांना ‘प्रेषित’ असे नावही दिले.
शिमोन (ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले) व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,
मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन,
याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहूदा इस्कर्योत.
येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनार्यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता;
तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले.
तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते.
तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले,
“अहो दीनांनो, तुम्ही धन्य;
कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात
ते तुम्ही धन्य;
कारण तुम्ही तृप्त व्हाल.
अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य;
कारण तुम्ही हसाल.
मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.
त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.
परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात.
अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात
त्या तुमची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्हांला भूक लागेल.
अहो, जे तुम्ही आता हसता
त्या तुमची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्ही शोक कराल व रडाल.
जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.