तो गालीलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.” तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा व ह्याच्यातून नीघ.” मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!” नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. मग सूर्यास्ताच्या वेळी, ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांना त्यांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. “तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आले, आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर गावांनाही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.” मग तो गालीलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
लूक 4 वाचा
ऐका लूक 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 4:31-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ