लूक 23
23
रोमी सुभेदार पिलात ह्याच्यापुढे येशू
1नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले.
2आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”
3तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.”
4तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.”
5तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.”
हेरोदापुढे येशू
6तेव्हा पिलाताने हे ऐकून “हा मनुष्य गालीली आहे काय?” असे विचारले.
7आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसांत यरुशलेमेत होता.
8येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला; कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बर्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहायला मिळेल अशी त्याला आशा होती.
9त्याने त्याला बरेच प्रश्न केले; परंतु येशूने काही उत्तर दिले नाही.
10मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते.
11आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले.
12त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते.
पिलात, बरब्बा व येशू
13मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले,
14“हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही;
15हेरोदालाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे; आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही.
16म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.”
17[कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरता एकाला सोडावे लागत असे.]
18परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
19हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता.
20येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले.
21तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले.
22तो त्यांना तिसर्यांदा म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.”
23पण ‘ह्याला वधस्तंभावर खिळाच’ असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला; आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले.
24तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला.
25नंतर दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले.
येशूला वधस्तंभावर खिळतात
26पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले.
27तेव्हा त्याच्यामागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता.
28येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा.
29कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील.
30त्या समयी ते ‘पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका.’
31ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?”
32त्याच्याबरोबर दुसर्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले.
33नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले.
34तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’
35लोक ‘पाहत’ उभे होते; अधिकारीही ‘नाक मुरडत म्हणाले,’ “त्याने दुसर्यांना वाचवले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.”
36शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की,
37“तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.”
38 हा यहूद्यांचा राजा आहे, असा [हेल्लेणी, रोमी, व इब्री अक्षरांत लिहिलेला] एक लेखही त्याच्या वरती होता.
39वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.”
40परंतु दुसर्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय?
41आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.”
42मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”
43येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”
येशूचा मृत्यू
44आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला;
45आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला.
46तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला.
47तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”
48हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले.
49तेव्हा त्याच्या ‘ओळखीचे’ सर्व जण व ज्या स्त्रिया त्याच्यामागे गालीलाहून आल्या होत्या त्या हे पाहत ‘दूर उभ्या राहिल्या होत्या.’
येशूची उत्तरक्रिया
50यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता.
51त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता.
52त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले.
53ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते.
54तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता.
55गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले.
56मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.
सध्या निवडलेले:
लूक 23: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.