धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते; तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो. नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो. कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता; त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत. पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’ अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.’ मग तो म्हणाला, ‘तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव; कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’ पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’ तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’ तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’
लूक 16 वाचा
ऐका लूक 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 16:14-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ