YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 16:14-31

लूक 16:14-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग ते परूशी धनाचे लोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला. येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांस त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे हे होते आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे व प्रत्येकजण त्यामध्ये शिरण्याचा जोराने प्रयत्न करीत आहे. नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे. जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी, पतीने सोडून दिलेल्या स्त्री सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो. कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे. त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते. त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहामाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले. श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखः सहन करीत आहे. परंतु अब्राहाम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस. आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की, पित्या, लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव, लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत. पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील. अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”

सामायिक करा
लूक 16 वाचा

लूक 16:14-31 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे ऐकून परूश्यांनी त्यांचा उपहास केला, कारण ते पैशावर प्रेम करत होते. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही स्वतःस दुसर्‍यांच्या दृष्टीने नीतिमान ठरविणारे असे आहात, परंतु परमेश्वर तुमचे हृदय जाणून आहे. लोक ज्याला महत्व देतात त्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने तुच्छ आहेत. “योहान येईपर्यंत मोशेचे नियमशास्त्र आणि संदेष्टे होते त्या वेळेपासून परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता गाजविली जात आहे आणि प्रत्येकजण आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहे. नियमशास्त्रातील एकही शब्द अथवा कानामात्रा काढून टाकणे यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे हे सोपे आहे. “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.” येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे. त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा भिकारी पडून होता, तो फोडांनी भरलेला होता. त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेला चुरा मिळावा या आशेने तो तेथे पडलेला असताना कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. “अशी वेळ आली की तो भिकारी मरण पावला आणि दूतांनी त्याला अब्राहामाजवळ नेले. श्रीमंत मनुष्यही मरण पावला, तेव्हा त्याला पुरण्यात आले. आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तेथे तो यातना भोगीत असताना, तेथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले. त्याने त्याला हाक मारली, ‘हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी कारण या अग्निज्वालांमध्ये मी कासावीस झालो आहे.’ “परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, तुझ्या आयुष्यात तुला चांगल्या गोष्टी भरून मिळाल्या, पण लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, म्हणून तो आता सांत्वन पावत आहे आणि तू क्लेश भोगीत आहेस. आणि या व्यतिरिक्त, आमच्या आणि तुमच्यामध्ये एक मोठी दरी स्थापलेली आहे, जे येथून तुझ्याकडे जाण्याची इच्छा करतात ते जाऊ शकत नाहीत किंवा तेथून आम्हापर्यंत ती दरी ओलांडून कोणीही येऊ शकत नाही.’ “तो म्हणाला, ‘मग हे पित्या, मी तुम्हाला विनवितो की, लाजाराला माझ्या कुटुंबाकडे पाठवा. कारण मला पाच भाऊ आहेत. ते सुद्धा या यातना स्थळी येऊ नयेत, म्हणून त्याने त्यांना सावध करावे.’ “पण अब्राहामाने उत्तर दिले, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.’ “ ‘हे पित्या अब्राहामा, नाही. परंतु मृतातून त्यांच्याकडे कोणी गेला तर, ते पश्चात्ताप करतील.’ “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्टे यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते खात्रीने ऐकणार नाहीत.’ ”

सामायिक करा
लूक 16 वाचा

लूक 16:14-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते; तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो. नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्‍याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो. कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता; त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत. पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’ अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.’ मग तो म्हणाला, ‘तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव; कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’ पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’ तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्‍चात्ताप करतील.’ तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’

सामायिक करा
लूक 16 वाचा

लूक 16:14-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

धनलोभी परुशी हे सर्व ऐकत होते व त्याला नाक मुरडत होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. माणसाला जे मौल्यवान वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे. योहानपर्यंत नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे लेख अंमलात होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यात प्रवेश मिळविण्यासाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. जो कोणी आपली पत्नी टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि पतीने टाकलेल्या स्त्रीबरोबर जो लग्न करतो, तो व्यभिचार करतो. एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालून, दररोज थाटामाटाने चैन करत असे. त्याच्या फाटकाजवळ फोडांनी भरलेल्या लाजर नावाच्या एका गरीब माणसाला ठेवण्यात आले होते. त्या श्रीमंताच्या टेबलावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे, अशी त्याची इच्छा असे. तेथे कुत्रे येऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे असे झाले की, तो गरीब माणूस निधन पावला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मरण पावला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना, त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी असलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहाम, लाजरने त्याच्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी म्हणून माझ्यावर दया करून त्याला माझ्याकडे पाठव, कारण ह्या ज्वालांत मी क्लेश भोगत आहे.’ परंतु अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू तुझ्या आयुष्यात तुझे सुख उपभोगलेस तसे लाजरने दुःख भोगले, ह्याची आठवण कर. परंतु आता त्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे, तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी आहे.’ तो म्हणाला, ‘बापा, तर मग मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. तिथे मला पाच भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने जाऊन त्यांना सावध करावे.’ परंतु अब्राहामने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे.’ तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहाम, ते पुरे आहे असे नाही, मात्र मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला, तर ते पश्चात्ताप करतील.’ तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील, तर मेलेल्यांमधूनसुद्धा कोणी उठला तरी त्यांची खातरी पटणार नाही.’”

सामायिक करा
लूक 16 वाचा