लेवीय 8
8
अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे समर्पण
(निर्ग. 29:1-37)
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोर्हा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन 3दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र कर.”
4परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले; आणि मंडळी दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमली.
5तेव्हा मोशेने मंडळीला सांगितले, “परमेश्वराने जे करायची आज्ञा दिली आहे ते हेच.”
6मोशेने अहरोनाला व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.
7मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा घातला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळली.
8मग त्याने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले.
9नंतर त्याच्या डोक्यावर मंदील घातला आणि मंदिलाच्या पुढच्या बाजूला सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट लावला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
10मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यात असलेल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून पवित्र केले.
11त्यातील थोडे तेल घेऊन त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक ह्यांना पवित्र करण्यासाठी अभिषेक केला.
12त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला.
13मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना अंगरखे घातले, कमरेला कमरबंद कसले आणि त्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
14मग त्याने पापार्पणाचा गोर्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोर्ह्याच्या डोक्यावर ठेवले.
15तो वधल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या चहूकडील शिंगांना व सभोवताली लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरता तिच्यासाठी प्रायश्चित्त केले.
16आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.
17पण गोर्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण हे सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
18मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.
19आणि त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडले.
20नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके, तुकडे आणि चरबी ह्यांचा होम केला.
21त्याची आतडी व पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले; ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
22मग त्याने दुसरा मेंढा म्हणजे समर्पणाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले.
23त्याचा वध केल्यावर त्याचे थोडे रक्त मोशेने घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.
24ते झाल्यावर मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला थोडे रक्त लावून ते वेदीवर सभोवती शिंपडले.
25त्याने चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली सर्व चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली;
26आणि परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक बेखमीर भाकर, तेल लावलेली एक पोळी व एक चपाती घेऊन त्या चरबीवर व उजव्या मांडीवर ठेवल्या.
27हे सर्व त्याने अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले.
28मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला; हे समर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य झाले.
29मोशेने ऊर घेऊन तो ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळला; समर्पणाच्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
30हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली.
31मोशेने अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांगितले की, “हे मांस दर्शनमंडपाच्या दाराजवळ शिजवा आणि तेथे समर्पणाच्या टोपलीतल्या भाकरीबरोबर ते खा; मी आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने व त्याच्या मुलांनी ते खावे.
32मांस व भाकरी ह्यांपैकी काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे;
33आणि तुमच्या समर्पणाचे सात दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण सात दिवस चालेल.
34आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित्त करावे अशी परमेश्वराने आज्ञा केली आहे.
35ह्याप्रमाणे तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराजवळ परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सात दिवस व रात्री राहा, नाहीतर तुम्ही मराल; कारण मला तशी आज्ञा झाली आहे.”
36मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी केल्या.
सध्या निवडलेले:
लेवीय 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.