YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26:27-46

लेवीय 26:27-46 MARVBSI

एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्याविरुद्ध वागलात, तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. आपल्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल. तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल. मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही. मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील. जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगत राहील; तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बाथ उपभोगत राहील. देश ओस असेपर्यंत त्याला विसावा मिळेल; म्हणजे तुम्ही त्यात राहत असता तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्याला मिळेल. तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील. कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील; तुमच्या शत्रूंशी सामना करण्यासाठी तुमच्यात त्राण उरणार नाही. राष्ट्राराष्ट्रांत पांगून तुम्ही नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हांला ग्रासून टाकील. तुमच्यातील जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशांत आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील आणि आपल्या वाडवडिलांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याप्रमाणेच खंगतील. त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील, तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्याविरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील, आणि त्यांचे अशुद्ध2 ह्रदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन. त्याचप्रमाणे इसहाकाशी केलेला करार व अब्राहामाशी केलेला करार ह्यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन. त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील. इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे; मी त्यांच्याकरता त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी सर्व राष्ट्रांदेखत त्यांना मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.” जे विधी, निर्बंध व नियम परमेश्वराने आपल्या व इस्राएल लोकांमध्ये सीनाय पर्वतावर मोशेच्या हस्ते ठरवले ते हेच होत.