YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 23

23
नेमून दिलेले सण
(गण. 28:16—29:40)
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांग, पवित्र मेळे भरवण्यासाठी परमेश्वराचे जे नेमलेले समय तुम्ही जाहीर करायचे ते माझे नेमलेले समय असे : 3सहा दिवस कामकाज करावे, पण सातवा दिवस परमविश्रामाचा शब्बाथ व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व घराघरांतून हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
4परमेश्वराचे जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे : 5पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो.
6त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकर खावी.
7पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.
8सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे; सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.”
9परमेश्वर मोशेला म्हणाला,
10“इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
11ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी; शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी.
12पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे.
13त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपिठाचे असावे; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हिन द्राक्षारस अर्पावा.
14तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये; तुमच्या सर्व घरा़घरांतून हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
15शब्बाथानंतरच्या दुसर्‍या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुरे सात शब्बाथ मोजावेत;
16सातव्या शब्बाथाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ नवे अन्नार्पण करावे.
17तुम्ही आपल्या निवासस्थानातून दोन दशमांश एफाभर सपिठाच्या दोन भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात; परमेश्वराप्रीत्यर्थ हे प्रथमउपजाचे अर्पण होय.
18वर्षावर्षाची सात दोषहीन कोकरे, एक गोर्‍हा आणि दोन मेंढे भाकरीबरोबर अर्पावेत; त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वराप्रीत्यर्थ त्यांचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
19मग पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी एकेक वर्षाचे दोन मेंढे अर्पावेत.
20याजकाने ती अर्पणे प्रथमउपजाच्या भाकरी-बरोबर त्या दोन मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावीत; ही परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्याची व्हावीत.
21तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की, आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
22तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कोनाकोपर्‍यातील सार्‍या पिकाची कापणी करू नका, आणि सरवा वेचू नका; गरीब व उपरे ह्यांच्यासाठी तो राहू द्या; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
23परमेश्वर मोशेला म्हणाला,
24“इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा.
25त्या दिवशी तुम्ही अंगमेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे.”
26परमेश्वराने मोशेला सांगितले,
27“त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्‍चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.
28त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्‍चित्ताचा दिवस होय; त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल.
29त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जिवाला दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
30कोणाही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले तर मी त्याला स्वजनांतून नाहीसा करीन.
31तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
32तो दिवस तुम्हांला परमविश्रामाचा शब्बाथ व्हावा व तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसर्‍या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बाथ पाळावा.”
33परमेश्वर मोशेला म्हणाला,
34“इस्राएल लोकांना सांग : त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ मांडवांचा सण पाळावा.
35पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.
36सात दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व आठव्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे; सणाचा हा समारोपदिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
37परमेश्वराचे नेमलेले समय हे होत. त्यांत हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र मेळे भरवावेत असे तुम्ही जाहीर करावे;
38ह्याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्बाथ पाळावेत, भेटी अर्पाव्यात, सर्व नवस फेडावेत आणि परमेश्वराला स्वसंतोषाची सर्व अर्पणे करावीत.
39जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ सण पाळावा; पहिला दिवस व आठवा दिवस हे परमविश्रामदिन होत.
40पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डाहळ्या, ओहळालगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्याच्यासमोर सात दिवस उत्सव करावा.
41प्रतिवर्षी सात दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
42तुम्ही सात दिवस मांडवात राहावे; जितके जन्मतः इस्राएल आहेत त्यांनी मांडवात राहावे;
43म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले तेव्हा मांडवात त्यांना राहायला लावले; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” ह्याप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना नेमलेले समय कळवले.

सध्या निवडलेले:

लेवीय 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन