YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 20

20
आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, इस्राएल लोकांपैकी अथवा इस्राएल लोकांमध्ये राहणार्‍या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पण केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा.
3मीही त्या मनुष्याला विन्मुख होऊन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन; कारण त्याने आपले अपत्य मोलखास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावला आहे.
4मोलखाला आपले अपत्य अर्पण करण्याकडे देशाचे लोक डोळेझाक करून त्याला जिवे मारणार नाहीत, 5तर मी त्या मनुष्याला व त्याच्या कुटुंबाला विन्मुख होऊन त्याचा व जे कोणी त्याला अनुसरून व्यभिचारी मतीने मोलखाच्या नादी लागतील, त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद करीन.
6जो मनुष्य व्यभिचारी मतीने पंचाक्षर्‍यांच्या व चेटक्यांच्या नादी लागतो त्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन;
7म्हणून तुम्ही आपल्याला पावन करून पवित्र व्हा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.
8तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा; तुम्हांला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे.
9आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे; जो आपल्या बापाला अथवा आईला शिव्याशाप देईल त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
10जो दुसर्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे.
11जो आपल्या पित्याच्या बायकोशी गमन करतो तो आपल्या पित्याची काया उघडी करतो; त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
12कोणी आपल्या सुनेशी गमन केले तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी विपरीत कृत्य केले आहे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
13कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
14एखादी स्त्री व तिची आई ह्या दोघींना कोणा पुरुषाने ठेवले1 तर तो अतिदुष्टपणा होय; तो पुरुष व त्या दोघी स्त्रिया ह्यांना अग्नीत जाळून टाकावे. तुमच्यामध्ये अतिदुष्टपणा नसावा.
15कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; त्या पशूलाही मारून टाकावे.
16कोणी स्त्री कुकर्म करायला एखाद्या पशूकडे जाईल तर त्या स्त्रीला व त्या पशूला मारून टाकावे; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
17कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो अथवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करून घेऊन तिची काया पाहील व ती त्याची काया पाहील तर हा निंद्य प्रकार होय; त्यांच्या भाऊबंदांच्या देखत त्या दोघांचा उच्छेद करावा. त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.
18ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुष गमन करील व तिची काया उघडी करील तर त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा केला असे होईल; त्या दोघांचाही स्वजनातून उच्छेद व्हावा.
19आपली मावशी अथवा आपली आत्या ह्यांची काया उघडी करू नये; जो कोणी तसे करील त्याने आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली असे होईल; त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.
20कोणी आपल्या चुलतीशी गमन केले तर त्याने आपल्या चुलत्याचीच काया उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगून निःसंतान मरतील.
21कोणी आपल्या भावजयीला बायको करून घेतले तर ती भ्रष्टता होय; तशा कृत्याने त्याने आपल्या भावाचीच काया उघडी केली असे होईल. ते निःसंतान राहतील.
22म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पाळावेत म्हणजे ज्या देशात वसाहत करण्यासाठी मी तुम्हांला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही.
23ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालवून देणार आहे त्यांच्या चालीरीतींचे तुम्ही अनुकरण करू नये; त्यांनी असली सर्व कृत्ये केली म्हणून मला त्यांचा तिटकारा आला आहे;
24त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन, असे मी तुम्हांला सांगितले आहे. तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे.
25म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, जो कोणताही पशू, पक्षी अथवा जमिनीवर रांगणारा प्राणी मी अशुद्ध ठरवून तुमच्यापासून दूर ठेवला आहे, त्याच्या योगे तुम्ही आपल्याला अमंगळ करू नये.
26तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ पवित्र व्हावे; कारण मी परमेश्वर पवित्र आहे; तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.
27कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे, त्यांना दगडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.

सध्या निवडलेले:

लेवीय 20: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन