विलापगीत 5
5
दयेची याचना
1हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा.
2आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.
3आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत.
4आमचेच पाणी आम्ही पैका देऊन पितो; आमचेच लाकूड आम्हांला मोल देऊन मिळते.
5आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही.
6आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो.
7आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगतो,
8दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही.
9रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवतो.
10क्षुधेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे.
11त्यांनी सीयोनेतील स्त्रिया, यहूदाच्या नगरातील कुमारी, भ्रष्ट केल्या आहेत.
12त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही.
13तरुण जन जाती वाहून नेतात, पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात,
14वेशीत वडील जन दिसत नाहीत, तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत.
15आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे; आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे.
16आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे; आम्ही पातक केले म्हणून हायहाय करीत आहोत.
17ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत;
18सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे त्यांतून कोल्हे फिरत असतात.
19हे परमेश्वरा, तू सर्वकाळ सिंहासनारूढ असतोस, तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे.
20तू आम्हांला सर्वकाळ का विसरतोस? तू आम्हांला दीर्घकाळ का सोडून देतोस?
21हे परमेश्वरा, तू आम्हांला आपणांकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हांला पुन्हा आण.
22तू आम्हांला सर्वस्वी टाकून दिले आहेस. तू आमच्यावर फार क्रोधायमान झाला आहेस.
सध्या निवडलेले:
विलापगीत 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.