YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 8

8
आय नगराचा पाडाव आणि नाश
1परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “भिऊ नकोस, कचरू नकोस; ऊठ, सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगरास जा. पाहा, आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;
2यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर; मात्र तेथील हाती लागेल ती मालमत्ता व गुरेढोरे तुम्ही आपल्यासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव.”
3त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठवले.
4त्याने त्यांना अशी आज्ञा केली की, “ऐका, नगराच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.
5मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करायला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोरून पळू लागू.
6आम्ही त्यांना चाळवत चाळवत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील; कारण त्यांना वाटेल, पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळू लागू;
7मग तुम्ही दबा धरणार्‍यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे.
8तुम्ही ते नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करा; मी तुम्हांला आज्ञा केली आहे.”
9मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्‍चिम बाजूला बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकां-बरोबरच राहिला.
10यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले. तो व इस्राएलाचे वडील जन लोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले.
11त्यांच्याबरोबर सर्व योद्धे चढाई करायला गेले, आणि आय नगराजवळ पोहचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला; ते व आय नगर ह्यांच्यामध्ये एक खोरे होते.
12त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्‍चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले.
13ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जायचे आणि पश्‍चिमेस कोणी दबा धरायचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री खोर्‍यात राहिला.
14आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील उताराकडे गेले, पण नगराच्या पिछाडीस लोक आपणांवर दबा धरून आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते.
15मग यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळू लागले.
16त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करत नगरापासून दूरवर गेले.
17इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा एकही पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर मोकळे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.
18तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुझ्या हाती असलेली बरची आय नगराकडे उगार. कारण ते मी तुझ्या हाती देईन.” त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बरची नगराकडे उगारली.
19त्याने आपला हात उगारताच दबा धरणार्‍यांनी लगबगीने उठून धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली.
20आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तो नगराचा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे पळण्याची ताकद राहिली नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणार्‍यांवर उलटले.
21दबा धरणार्‍यांनी नगर हस्तगत केल्याचे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलाने पाहिले तेव्हा ते मागे उलटून आयकरांवर तुटून पडले.
22त्यांच्याशी सामना करायला ती दुसरी टोळीही नगरातून निघाली; असे ते दोहो बाजूंनी इस्राएलाच्या कचाट्यात सापडले; इस्राएलाने त्यांचा संहार केला; त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाही किंवा निसटून गेला नाही.
23आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले.
24ज्या मोकळ्या रानात इस्राएलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथे त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि त्यांचा तलवारीने साफ फडशा उडवला; त्यानंतर सर्व इस्राएल आय नगरात परत आले व त्यावरही त्यांनी तलवार चालवली.
25त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली. ते सर्व स्त्रीपुरुष मिळून बारा हजार होते.
26आय येथील सर्व रहिवाशांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही.
27परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरातली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.
28तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला; आजपर्यंत तो तसाच आहे.
29आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरवून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली; ती आजपर्यंत आहे.
एबाल डोंगरावर लिहिण्यात आलेले नियम
(अनु. 27:1-26)
30मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;
31परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने इस्राएल लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे, अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली; त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पण केले आणि शांत्यर्पणे वाहिली.
32तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने त्या दगडांवर मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहून काढली.
33परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणार्‍या लेवीय याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अंमलदार आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरे हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरिज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले.
34त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथांत लिहिलेली आशीर्वादाची व शापाची सर्व वचने त्याने वाचून दाखवली.
35इस्राएलाच्या सबंध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरे ह्यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या; त्यांतला एकही शब्द त्याने गाळला नाही.

सध्या निवडलेले:

यहोशवा 8: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन