YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 24:1-13

यहोशवा 24:1-13 MARVBSI

नंतर यहोशवाने इस्राएलाच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्राएलाचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले; आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहाम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदीपलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करत. तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला. मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले, आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला; याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला. नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले; नंतर मी तुम्हांला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले; मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला आणि मिसरी लोकांनी रथ व स्वार ह्यांसह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिसर्‍यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिलात. मग मी तुम्हांला यार्देनेच्या पूर्वेस राहणार्‍या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले; मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला; तुमच्यापुढून मी त्यांचा संहार केला. नंतर मवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्राएलाशी युद्ध केले; तुम्हांला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले; पण मी बलामाचे ऐकायला तयार नव्हतो म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशा प्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीस गांधीलमाशा पाठवल्या व त्यांनी अमोर्‍यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले; मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हांला दिली; जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यांत तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात.