YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 7

7
ईयोब परमेश्वराशी वाद घालतो
1“ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना?
2आपल्याला सावलीत कधी बसायला मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो, मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो,
3त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालायचे आहेत, कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आहेत.
4मी पडलो असता म्हणतो, ‘मी केव्हा उठेन? रात्र केव्हा निघून जाईल?’ दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो.
5माझा देह किड्यांनी व धुळीच्या थरांनी भरला आहे; माझी त्वचा बरी होते आणि पुन्हा चिघळते.
6माझे दिवस साळ्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात; ते निराशेने निघून जातात.
7माझा प्राण केवळ वायू आहे, माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसणार नाही, हे लक्षात आणा.
8जो मला आता पाहत आहे त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही; तुझे नेत्र माझा शोध करतील, पण मी नसणार.
9मेघ ज्याप्रमाणे वितळून नाहीसा होतो, तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही,
10तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही, त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.
11ह्यामुळे मी आपले तोंड आटोपणार नाही; मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेन; माझ्या जिवास क्लेश होतात म्हणून मी गार्‍हाणे करीन.
12मी काय सागर किंवा समुद्रातला राक्षस आहे म्हणून तू माझ्यावर सक्त नजर ठेवतोस?
13माझा बिछाना मला शांती देईल, ‘माझा पलंग माझा खेद काहीसा हलका करील’ असे मी म्हणतो;’
14तेव्हा तू मला स्वप्ने पाडून घाबरे करतोस, मला दृष्टान्त दाखवून भयभीत करतोस;
15म्हणून माझ्या अस्थिपंजरापेक्षा माझा गळा दाबून मला मारले तर ते मला बरे!
16मला आपल्या जिवाचा वीट आला आहे; सर्वकाळ जगणे मला नको. माझे नाव सोडून दे, कारण माझे दिवस श्वासवत आहेत.
17मानव तो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,
18रोज सकाळी त्याचा समाचार घ्यावा, व क्षणोक्षणी त्याची कसोटी पाहावी?
19तू माझ्यावरची आपली नजर काढत नाहीस, अवंढा घोटायलाही अवसर देत नाहीस, असे कोठवर चालणार?
20हे मानवरक्षका! मी पाप केले असले तर त्यात तुझे काय गेले? तू मला आपले निशाण का करून ठेवले आहेस? मी आपणाला भार मात्र झालो आहे.
21तू माझा अपराध का क्षमा करत नाहीस? माझ्या ठायीचा दोष का घालवत नाहीस? आता तर मी धुळीत पडून राहणार तू माझा पुष्कळ शोध करशील पण मी नसणार.”

सध्या निवडलेले:

ईयोब 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन