YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 36:1-21

ईयोब 36:1-21 MARVBSI

अलीहू आपले भाषण पुढे चालवून म्हणाला, “अंमळ थांब; देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे, असे मी तुला दाखवतो. मी दुरून आपले ज्ञान आणून आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्याय्यत्व स्थापित करीन. माझे शब्द वास्तविक खोटे नाहीत; हा पूर्ण ज्ञानी पुरुष तुझ्यापुढे उभा आहे. पाहा, देव समर्थ आहे तरी तो कोणाला तुच्छ मानत नाही; त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे. तो अधर्म्यांना वाचवत नाही; तो दीनांचा न्याय करतो. तो नीतिमानांवरील आपली दृष्टी काढत नाही, तर त्यांना राजांबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापतो, व त्यांची उन्नती होते. त्यांना बेड्यांनी जखडले, दुःखरूप रज्जूंनी त्यांना बांधून ठेवले, तर त्यांची कृती व त्यांचे अपराध ह्यांची त्यांना जाणीव करून देतो, त्यांनी उन्मत्तपणाचे वर्तन केले असे त्यांना दाखवून देतो. त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करतो, आणि त्यांना अधर्म सोडायला सांगतो. हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील, आपली वर्षे सुखाने काढतील; पण त्यांनी ऐकले नाही तर ते शस्त्राने ठार होतील; ज्ञानप्राप्तीवाचून त्यांचा प्राणान्त होईल. जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगतात; त्याने त्यांना बांधले असता ते धावा करीत नाहीत. ते भरज्वानीत मरतात; त्यांचा प्राण अमंगळ पुरुषांप्रमाणे नाश पावतो; तो दुःखितांना त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडवतो; विपत्तीच्या द्वारे त्यांची कानउघाडणी करतो. तो तुलाही दुःखाच्या जबड्यातून सोडवून संकोच नाही अशा प्रशस्त स्थली नेतो; तुझ्या मेजावर मिष्टान्नाची रेलचेल होईल. तू दुष्टांसारखा दोषारोप करीत राहशील; तर दोषारोप व न्यायदंड ह्यांच्या तावडीत तू सापडशील. आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नकोस; हा खंड भारी आहे म्हणून बहकू नकोस. तुझ्या अपार संपत्तीचा तुझ्या संपत्तीच्या सार्‍या बळाचा काही उपयोग होईल काय? लोक जागच्या जागी नष्ट होतील अशा रात्रीची उत्कंठा धरू नकोस. सांभाळ, दुष्टतेकडे वळू नकोस; ती तुला दुःखापेक्षा पसंत वाटत आहे.