YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 1:13-22

ईयोब 1:13-22 MARVBSI

एके दिवशी असे झाले की, ईयोबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता, एका जासुदाने ईयोबाकडे येऊन सांगितले, “बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या. तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले; हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे.” तो हे सांगत आहे इतक्यात दुसर्‍या एकाने येऊन सांगितले, “दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला; त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.” तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून उंटांवर घाला घातला व ते ते घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले, हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.” तो सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत होती, तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वार्‍याच्या सोसाट्याने त्या घराचे चार्‍ही कोपरे हादरले; त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.” मग ईयोबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!” ह्या सर्व प्रसंगांत ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.