ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत, हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांपैकी एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”
योहान 6 वाचा
ऐका योहान 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 6:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ