YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 1:19-34

योहान 1:19-34 MARVBSI

पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना योहानाला “आपण कोण आहात?” असे विचारण्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे. त्याने कबूल केले, नाकारले नाही; “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्यावर त्याने “नाही” असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?” तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणार्‍याची वाणी’ मी आहे.” ती पाठवलेली माणसे परूश्यांपैकी होती. त्यांनी त्याला विचारले, “आपण ख्रिस्त नाही, एलीया नाही, व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता?” योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुमच्यामध्ये उभा आहे; जो माझ्यामागून येणारा आहे, [तो माझ्यापूर्वी होता,] त्याच्या पायतणाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही.” यार्देनेच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या. दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे, कारण ‘तो माझ्यापूर्वी होता’ असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्राएलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे.” आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ मी स्वत: पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”