योहान 1:19-34
योहान 1:19-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि योहानाची साक्ष ही आहे; जेव्हा यहूदी अधिकाऱ्यांनी यरूशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की, “तू कोण आहे?” त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्यास विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात का?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.” यावरुन ते त्यास म्हणाले, “आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?” तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा ज्याच्या वाट सरळ करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.” आणि पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती. आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले, “आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलीया नाही किंवा तो संदेष्टाही नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?” योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखित नाही असा एकजण तुम्हामध्ये उभा आहे. तो माझ्यामागून येणारा आहे, त्याच्या वहाणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही.” यार्देनेच्या पलीकडील बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे या गोष्टी घडल्या. दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की, ‘माझ्यामागून एकजण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता,’ तो हाच आहे. मी त्यास ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.” योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्यास ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
योहान 1:19-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा यहूदी पुढार्यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय. तो कबूल करण्यास कचरला नाही, त्याने मोकळेपणाने सांगितले, तो म्हणाला, “मी ख्रिस्त नाही.” त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीया आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” “मग आपण संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” शेवटी ते म्हणाले, “तर मग आपण आहात तरी कोण? आम्हाला सांगा, म्हणजे ज्यांनी आम्हाला हे विचारण्यास पाठविले आहे त्यांना उत्तर देता येईल.” यशया संदेष्टा याच्या शब्दात योहानाने उत्तर दिले, मी अरण्यात घोषणा करणारी वाणी आहे, ती म्हणते, “ ‘प्रभुचे मार्ग सरळ करा.’ ” आता ज्या परूश्यांनी त्यांना पाठविले होते, त्यांनी प्रश्न विचारला की, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीया नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?” तेव्हा योहान उत्तरला, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु तुम्हामध्ये एकजण असा आहे की, ज्याला तुम्ही ओळखत नाही. तो हाच आहे जो माझ्यानंतर येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासाठी एक दास होण्याची देखील माझी पात्रता नाही.” हे सर्व यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे घडले, जेथे योहान बाप्तिस्मा देत होता. दुसर्या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा! ते हेच आहेत, ज्यांच्या संदर्भात मी म्हणत होतो, ‘हा मनुष्य जो माझ्यानंतर येणार आहे, ते माझ्यापेक्षा थोर आहे कारण ते माझ्यापूर्वी होता.’ मला स्वतः त्यांची ओळख नव्हती, पण मी याच कारणासाठी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो की त्यांनी इस्राएल लोकांस प्रकट व्हावे.” मग योहानाने अशी साक्ष दिली: “स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा खाली आला व त्यांच्यावर स्थिरावला. मी स्वतः त्यांना ओळखत नव्हतो, परंतु ज्यांनी मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी पाठविले त्यांनी मला सांगितले होते की, ‘ज्या मनुष्यावर आत्मा उतरताना आणि स्थिरावताना तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’ हे घडताना मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष देतो की हे परमेश्वराचे पुत्र आहेत.”
योहान 1:19-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना योहानाला “आपण कोण आहात?” असे विचारण्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे. त्याने कबूल केले, नाकारले नाही; “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्यावर त्याने “नाही” असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?” तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणार्याची वाणी’ मी आहे.” ती पाठवलेली माणसे परूश्यांपैकी होती. त्यांनी त्याला विचारले, “आपण ख्रिस्त नाही, एलीया नाही, व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता?” योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुमच्यामध्ये उभा आहे; जो माझ्यामागून येणारा आहे, [तो माझ्यापूर्वी होता,] त्याच्या पायतणाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही.” यार्देनेच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या. दुसर्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे, कारण ‘तो माझ्यापूर्वी होता’ असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्राएलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे.” आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ मी स्वत: पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
योहान 1:19-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना पाठवून योहानला विचारले, “आपण कोण आहात?” तेव्हा योहानने दिलेली ही साक्ष आहेः त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, तर स्पष्ट म्हटले, “मी ख्रिस्त नाही.” त्यांनी त्याला विचारले, “मग कोण? आपण एलिया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आम्ही ज्याची वाट पहात आहोत तो संदेष्टा आपण आहात काय?” त्यावर त्याने उत्तर दिले, “नाही.” तेव्हा ते त्याला म्हणाले, “ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहात, हे आम्हांला सांगा. आपले स्वतःविषयी काय म्हणणे आहे?” त्याने उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे “परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.” ही माणसे परुशी लोकांनी पाठवली होती. त्यांनी त्यानंतर योहानला विचारले, “आपण ख्रिस्त नाहीत, एलिया नाहीत व संदेष्टाही नाहीत, तर मग आपण बाप्तिस्मा का देता?” योहानने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा देतो. परंतु ज्याला तुम्ही ओळखत नाही, असा एक तुमच्यात उभा आहे. तो माझ्यानंतर येत आहे, त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.” यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे योहान बाप्तिस्मा देत होता. तेथे ह्या गोष्टी घडल्या. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू! “जो माझ्यानंतर येत आहे, तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता’, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हा आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्राएली लोकांना त्याची ओळख व्हावी म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा देत आलो आहे.” योहानने अशी साक्ष दिली, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो परंतु ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा द्यायला पाठवले, त्याने मला सांगितले, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना तू पाहशील, तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणारा आहे.’ मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”