YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 46

46
मिसराविषयीची भविष्ये
1परमेश्वराचे राष्ट्रांविषयी जे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले ते हे.
2मिसराविषयी : मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी :
3“ढाल व कवच सिद्ध करा, युद्धास उभे राहा;
4रथांना घोडे जुंपा; घोड्यांवर स्वार व्हा; शिरस्त्राण घालून उभे राहा; भाले घासून साफ करा; चिलखत घाला.
5माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.
6चपळ माणसाला पळून जाता येणार नाही, वीराला निसटून जाता येणार नाही; उत्तर दिशेस फरात नदीच्या तीरी ते ठोकर खाऊन पडत आहेत.
7नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे? त्याचे जल नद्यांप्रमाणे उसळत आहे.
8नील नदीप्रमाणे मिसर उसळत आहे; त्याचे जल नद्यांप्रमाणे उसळत आहे; तो म्हणतो, मी चढाई करून जाईन, मी पृथ्वी व्यापून टाकीन; मी नगराचा व त्यातील रहिवाशांचा नाश करीन.
9अश्वांनो, दौड करा; रथांनो, भरधाव चाला; वीरहो, पुढे चाला; ढालाईत कूश व पूट, धनुर्धारी, धनुष्य वाकवणारे लूदी तुम्ही सर्व चालू लागा.
10तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.
11हे कुमारिके, मिसरकन्ये, चढून गिलादास जा, तेथे मलम घे! तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहेस; तुझ्या घावाला मलमपट्टी नाही.
12राष्ट्रांनी तुझी अपकीर्ती ऐकली आहे, तुझ्या आक्रोशाने पृथ्वी भरली आहे; कारण वीराला वीर टक्कर देऊन एकत्र पडत आहेत.”
13बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर येऊन मिसर देशावर मारा करील, त्याविषयी यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :
14“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’
15तुझ्या बलिष्ठांचा का निःपात झाला आहे? त्यांना उभे राहवले नाही, कारण परमेश्वराने त्यांना ढकलून दिले आहे.
16परमेश्वराने पुष्कळांना ठेचा खाण्यास लावले; ते एकावर एक पडले; ते म्हणाले, ‘उठा, आपण ह्या पिडणार्‍या तलवारींपासून निभावून आपल्या लोकांकडे परत जाऊ; आपल्या मातृभूमीस जाऊ.’
17ते तेथे ओरडले की, ‘मिसर देशाचा राजा फारो म्हणजे पोकळ गर्जनाच होय; नेमलेली वेळ त्याने दवडली.’
18राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.
19मिसरनिवासिनी कन्ये, बंदिवासात जाण्यासाठी सामग्री तयार कर; कारण नोफ उजाड होईल, जळून निर्जन होईल.
20मिसर ही फार सुंदर तरुण कालवड आहे; पण उत्तरेहून एक गांधीलमाशी आली आहे हो आली आहे!
21तिचे भाडोत्री शिपाईही तिच्यामध्ये लठ्ठ वासरांसारखे आहेत; ते आपली पाठ फिरवून सगळेच पळून जातात; ते तोंड देत नाहीत, कारण त्यांच्या नाशाचा दिवस, त्यांच्या पारिपत्याचा समय त्यांच्यावर आला आहे.
22सर्प सरसर चालतो तसा तिचा आवाज होतो; ते सैन्यांसह येतात; लाकूडतोड्याप्रमाणे ते तिच्यावर कुर्‍हाडी घेऊन येतात.
23परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत.
24मिसरकन्येची अब्रू गेली आहे; तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले आहे.”
25सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो : “पाहा नो येथला आमोन, फारो, मिसर व त्यांची दैवते आणि राजे, फारो व त्याच्यावर भिस्त ठेवणारे ह्यांचा मी समाचार घेईन.
26त्यांचा घात करू पाहणारे, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती मी त्यांना देईन; तरी पुढे त्यात पूर्वकालाप्रमाणे पुन्हा वस्ती होईल, असे परमेश्वर म्हणतो.
27हे माझ्या सेवका, याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; पाहा, मी तुला दूर देशातून वाचवून आणीन, तुझ्या संततीला बंदिवासातून मुक्त करीन; याकोब परत येईल, निर्भयपणे विश्रांती पावेल, त्याला कोणी धाक घालणार नाही.
28परमेश्वर म्हणतो, माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; कारण मी तुझ्याबरोबर आहे; ज्या राष्ट्रांत मी तुला हाकून दिले आहे, त्या सर्वांचा मी सर्वस्वी नाश करीन, पण तुझा सर्वस्वी नाश करणार नाही; तरी मी तुझे योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”

सध्या निवडलेले:

यिर्मया 46: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन