YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 42

42
योहानानला यिर्मयाचा संदेश
1तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन,
2यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,
3आम्ही कोणत्या मार्गाने जावे व काय करावे हे परमेश्वर आपला देव ह्याने आम्हांला दाखवावे.”
4मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे म्हणणे ऐकले आहे; पाहा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वर तुमचा देव ह्याची प्रार्थना करीन व जे काही परमेश्वर तुमच्याविषयी सांगेल ते मी तुम्हांला कळवीन; तुमच्यापासून काही लपवणार नाही.”
5ते यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वर आपला देव आपल्या हस्ते जे वचन आम्हांला सांगून पाठवील त्या सर्वांप्रमाणे आम्ही न केले तर परमेश्वर आमच्याविरुद्ध खरा विश्वसनीय साक्षी असो.
6परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे आम्ही आपणाला पाठवतो; त्याचे म्हणणे बर्‍याचे असो की वाइटाचे असो आम्ही ते ऐकू; म्हणजे परमेश्वर आमचा देव ह्याची वाणी ऐकल्यावर आमचे कल्याण होईल.”
7दहा दिवसांनी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले.
8तेव्हा योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबरचे सैन्यांचे सर्व नायक व लहानथोर सर्व लोक ह्यांना त्याने बोलावले,
9आणि त्यांना म्हटले, “तुम्ही आपली विनंती इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यापुढे सादर करण्यास मला पाठवले; तो असे म्हणतो,
10ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे.
11ज्या बाबेलच्या राजाची तुम्ही भीती धरता त्याला भिऊ नका; परमेश्वर म्हणतो, त्याला भिऊ नका; कारण तुमचा बचाव करण्यास व त्याच्या हातून तुम्हांला मुक्त करण्यास मी तुमच्याबरोबर आहे.
12मी तुमच्यावर दया करीन म्हणजे त्याची दया तुमच्यावर होईल व तो तुम्हांला तुमच्या देशात वस्ती करू देईल;
13पण तुम्ही जर म्हणाल, ‘आम्ही ह्या देशात राहणार नाही, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकणार नाही,’
14आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’
15तर अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मिसर देशात जाऊन तेथे काही दिवस राहण्याचा तुमचा निश्‍चय असला तर
16ज्या तलवारीची तुम्हांला भीती वाटत आहे ती मिसर देशात तुम्हांला गाठील, व ज्या दुष्काळाची तुम्हांला भीती वाटते, तो मिसर देशात तुमच्या पाठोपाठ येईल; तेथे तुम्ही मराल.
17ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्‍चय केला आहे ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील; मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन तेव्हा त्यांच्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही.
18“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्‍यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.
19अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, परमेश्वराने तुम्हांला सांगितले आहे की, ‘मिसर देशात जाऊ नका, मी तुम्हांला आज बजावून सांगत आहे हे पक्के लक्षात ठेवा.’
20ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू.
21ते आज मी तुम्हांला कळवले आहे; तरी परमेश्वर तुमचा देव ह्याने माझ्या द्वारे तुम्हांला जे सांगून पाठवले त्यांतल्या कशाविषयीही तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही.
22म्हणून ज्या स्थळी जाऊन राहण्याची तुमची इच्छा आहे तेथे तुम्ही तलवार, दुष्काळ, दुर्भिक्ष व मरी ह्यांनी मराल हे पक्के समजा.”

सध्या निवडलेले:

यिर्मया 42: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन