YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 35

35
रेखाब्यांचे आज्ञापालन
1यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या दिवसांत परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :
2“रेखाब्यांच्या घराण्याकडे जा, त्यांच्याबरोबर भाषण कर, आणि परमेश्वराच्या मंदिरात, त्यातल्या एका कोठडीत आणून त्यांना द्राक्षारस प्यायला दे.”
3तेव्हा मी याजना बिन यिर्मया बिन हबसिन्या ह्याला, त्याच्या बांधवांना व त्याच्या पुत्रांना आणि रेखाब्यांच्या घराण्यातील इतर सर्वांना बरोबर घेतले.
4आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.
5तेव्हा मी त्या रेखाबवंशजांपुढे द्राक्षारसाने भरलेले कटोरे व पेले ठेवले व त्यांना म्हणालो, “द्राक्षारस प्या.”
6पण ते म्हणाले, “आम्ही द्राक्षारस पिणार नाही, कारण आमचा पूर्वज रेखाब ह्याचा पुत्र योनादाब ह्याने आम्हांला ताकीद केली आहे की, ‘तुम्ही व तुमच्या वंशजांनी द्राक्षारस कदापि पिऊ नये.
7तुम्ही कधी घरेदारे बांधू नका, शेते पेरू नका, द्राक्षांचे मळे लावू नका, त्यांची मालकीही पत्करू नका; तर आपले आयुष्य तंबूत घालवा, म्हणजे ज्या देशात तुम्ही उपरे आहात त्यात तुमचा बहुत दिवस निभाव लागेल.’
8आमचा पूर्वज रेखाब ह्याचा पुत्र योनादाब ह्याने आम्हांला जो निर्बंध घालून दिला तो सर्व आजवर आम्ही पाळत आलो आहोत; आमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांसह आम्ही कधी द्राक्षारस प्यालो नाही;
9राहण्यास घरे बांधली नाहीत; द्राक्षाचे मळे, शेते, बी वगैरे आमचे काही नाही;
10आम्ही तंबूत राहतो, आमचा पूर्वज योनादाब ह्याने सांगितलेले ऐकून त्या सगळ्याप्रमाणे आम्ही वागत आलो आहोत.
11बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्या देशावर चालून आला तेव्हा मात्र आम्ही म्हटले, ‘खास्द्यांचे सैन्य व अराम्यांचे सैन्य ह्यांच्या भीतीस्तव चला, आपण यरुशलेमेस जाऊ.’ म्हणून आज आम्ही यरुशलेमेत राहत आहोत.”
12तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की,
13“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांना जाऊन सांग की माझी वचने ऐकण्याचा बोध तुम्ही का घेत नाही?”
14रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याने आपल्या वंशजांना द्राक्षारस न पिण्याविषयी आज्ञा केली, त्याप्रमाणे त्यांच्याकडून वागणूक होत आहे; त्यांनी आजवर द्राक्षारसाचे सेवन केले नाही; आपल्या पूर्वजांची आज्ञा त्यांनी मानली; पण मी मोठ्या निकडीने तुम्हांला सांगत आलो तरी तुम्ही माझे ऐकले नाही.
15मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.
16रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याच्या वंशजांनी, आपल्या पूर्वजाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन केले आहे, पण हे लोक माझे ऐकतना.
17ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.”
18तेव्हा यिर्मया रेखाबवंशजांना म्हणाला, “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही आपला पूर्वज योनादाब ह्याचा निर्बंध मानला व त्याच्या सर्व आज्ञा पाळल्या व त्याने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले;
19म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझ्या सेवेस हजर राहण्यासाठी रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याच्या घराण्यात कोणा पुरुषाची उणीव कधीच पडणार नाही.”

सध्या निवडलेले:

यिर्मया 35: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन