YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 31:1-14

यिर्मया 31:1-14 MARVBSI

परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व वंशांचा देव होईन व ते माझे लोक होतील.” परमेश्वर म्हणतो, “तलवारीपासून निभाव-लेल्या लोकांना रानात अनुग्रह मिळाला; ह्या इस्राएलास विश्रांती देण्यास मला जाणे आहे. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्‍यांनी भूषित होशील व उत्सव करणार्‍यांबरोबर नृत्य करशील. शोमरोनाच्या डोंगरावर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील; लावणारे लावतील व त्यांची फळे त्यांना लाभतील. कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर जागल्ये ओरडून सांगतील, ‘अहो उठा, आपण सीयोनेस आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे जाऊ.”’ कारण परमेश्वर म्हणतो, “याकोबासाठी आनंदाचा गजर करा; राष्ट्रांच्या अग्रेसराचा जयजयकार करा; घोषणा करा, स्तवन करा व म्हणा, ‘हे परमेश्वरा, तुझ्या लोकांचा, इस्राएलाच्या अवशेषाचा उद्धार कर.’ पाहा, मी त्यांना उत्तरेच्या देशांतून आणीन, त्यांना पृथ्वीच्या दिगंताहून जमा करीन; त्यांच्यामध्ये आंधळे व पांगळे, गर्भवती व प्रसूतिवेदना लागलेल्या असतील; मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील. ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे. अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका; दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा व म्हणा, ‘ज्याने इस्राएलास विखरले तो त्यांना जमा करील;’ मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करतो तशी तो त्यांची निगा करील. कारण परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून मुक्त केले आहे. ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरामेंढरांचे वत्स ह्यांकडे लोटतील; त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल; ह्यापुढे ते म्लान होणार नाहीत. त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील; वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील; मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन. आणि मी त्यांच्या याजकांचा जीव मिष्टान्नांनी तृप्त करीन; माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील, असे परमेश्वर म्हणतो.”