YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 20

20
यिर्मयाला कैद केल्याबद्दल पशहूराला शाप
1परमेश्वराच्या मंदिरातील प्रमुख अधिपती इम्मेराचा पुत्र पशहूर ह्याने यिर्मया जो हा संदेश सांगत होता तो ऐकला.
2तेव्हा पशहूराने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि परमेश्वराच्या मंदिरातील वरल्या बाजूस बन्यामीनद्वारात खोडे होते त्यांत त्याला अडकवून ठेवले.
3सकाळी पशहूराने यिर्मयाला खोड्यांतून काढून बाहेर आणले, तेव्हा यिर्मया त्याला म्हणाला, “परमेश्वराने तुझे नाव पशहूर नव्हे तर मागोर-मिस्साबीब (चोहोकडे दहशत) ठेवले आहे.
4परमेश्वर म्हणतो, पाहा, तू स्वत:ला व तुझ्या सर्व इष्टमित्रांना दहशत होशील, असे मी करीन; ते आपल्या शत्रूंच्या तलवारीने पडतील, हे तुझे डोळे पाहतील; बाबेलच्या राजाच्या हाती मी सर्व यहूदा देईन; तो त्यांना बंदिवान करून बाबेलास नेईल व तलवारीने वधील.
5नगरातले सर्व निधी, त्यातली सर्व कमाई, त्यातल्या सर्व मोलवान वस्तू व यहूदाच्या राजांची सर्व भांडारे मी त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन, आणि ते ती लुटून बाबेलास घेऊन जातील.
6हे पशहूरा, तू व तुझ्या घरात राहणारे ह्या सर्वांना धरून नेण्यात येईल; तू बाबेलास जाऊन तेथे मरशील; तुला व ज्यांना तू खोटा संदेश दिला, त्या तुझ्या सगळ्या इष्टमित्रांना तेथेच पुरतील.”
यिर्मयाचा शोक
7हे परमेश्वरा, तू मला फसवलेस आणि मी फसलो; तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करतो.
8कारण मी बोलू लागलो की, “जुलूम, लूट!” हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे.
9मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.
10कारण मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्याविरुद्ध गिल्ला करा, आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू; कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू.”
11तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत; ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील; विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल.
12तरी हे नीतिमानांचे सत्त्व पाहणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे; कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.
13परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा; कारण तो दुष्कर्म्याच्या हातून दीनाचा जीव वाचवतो.
14मी जन्मलो तो दिवस शापित असो; माझी आई मला प्रसवली तो दिवस धन्य न होवो!
15“तुला पुत्र झाला” हे वर्तमान माझ्या बापाला कळवून त्याला फार हर्षित करणारा मनुष्य शापित असो.
16ज्या नगरांचा विध्वंस करून परमेश्वर अनुताप पावला नाही त्यांच्यासारखा तो मनुष्य होवो; सकाळी आरोळी, दुपारी रणशब्द त्याच्या कानी पडो.
17त्याने मला गर्भाशयातच मारून टाकले नाही; टाकता तर माझी आई माझी कबर झाली असती, तिचे गर्भस्थान सदा सगर्भ राहिले असते.
18मी कष्ट व क्लेश भोगावे व माझे दिवस अप्रतिष्ठेत घालवावे ह्याकरताच मी गर्भाशयातून बाहेर निघालो काय?

सध्या निवडलेले:

यिर्मया 20: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन