YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 2

2
अधोगतीस चाललेल्या इस्राएलाची परमेश्वराने केलेली मनधरणी
1तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.
3इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असा होता; त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”
4हे याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
5परमेश्वर म्हणतो की, “तुमच्या पूर्वजांना माझ्या ठायी असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले?
6ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्या परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून आणले, आम्हांला रानातून वैराण व खाच-खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्युच्छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जातयेत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हांला नेले, तो परमेश्वर कोठे आहे?’
7मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.
8‘परमेश्वर कोठे आहे?’ असे याजक म्हणाले नाहीत व नियमशास्त्राचा कारभार चालवणार्‍यांनी मला जाणले नाही; लोकपालही1 माझ्यापासून फितले; संदेष्टे बआलदैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.
9म्हणून मी तुमच्याशी आणखी वाद करीन, मी तुमच्या मुलांशी वाद चालवीन, असे परमेश्वर म्हणतो.
10कित्ती लोकाच्या द्वीपात जाऊन पाहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा, व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पाहा.
11जे देवच नाहीत असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले काय? तरीपण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला, जिच्यात हित नाही अशा गोष्टीशी केला आहे.
12हे आकाशा, हे पाहून भयचकित हो; थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो.
13कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.
14इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे?
15तरुण सिंहांनी त्याच्यावर गर्जना केली आहे, त्यांनी महानाद केला आहे; त्यांनी त्याचा देश उजाड केला आहे, त्याची नगरे जाळून-पोळून निर्जन केली आहेत.
16नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.
17तुझा देव परमेश्वर तुला मार्गाने नेत असता त्याला सोडून तू हे आपणावर आणले नाही काय?
18मिसर देशाच्या वाटेस लागून नील नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन? अश्शूर देशाच्या वाटेस लागून फरात नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन?
19तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझेच पतन तुला शिक्षा करील; तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर जो तुझा देव त्याला तू सोडले आहेस; आणि तुला माझा धाक वाटत नाही हे अनिष्टकारक व क्लेशदायक आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
20कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.
21मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?
22तर तू आपणांस खाराने धुतले व आपणास पुष्कळसा साबण लावला तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
23‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्‍यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.
24ती रानात हिंडायला सवकलेली, कामातूर होऊन धापा टाकणारी रानगाढवी आहे; ती हातेणास आली असता तिला कोण रोखील? तिला धरायला जाणार्‍यांनी शिणण्याचे कारण नाही; तिच्या ऋतूत ती हाती लागेल.
25आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’
26चोराला पकडले म्हणजे तो जसा लाजतो तसे इस्राएलाचे घराणे लज्जित झाले आहे; ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झाले आहेत.
27ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’
28तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.
29तर तुम्ही माझ्याशी का वाद घालता? तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
30तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.
31अहो, ह्या पिढीचे लोकहो! तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा; मी इस्राएलास वैराण, निबिड काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? ‘आम्ही मोकाट झालो आहोत, ह्यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही’, असे माझे लोक का म्हणतात?
32कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत.
33तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस.
34निर्दोष, दीन जनांच्या जिवांचे रक्त तुझ्या अंगावरील वस्त्रांत सापडले आहे; ते तुझे घर फोडताना तुझ्या हाती लागले नाहीत, तर ह्या सर्वांना तुझे वर्तन कारण झाले.
35तरी तू म्हणालीस, ‘मी निर्दोष आहे, त्याचा राग माझ्यावरून फिरलाच आहे;’ तू म्हणालीस, ‘मी पाप केले नाही’ म्हणून पाहा, मी तुझ्याशी दावा चालवीन.
36आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.
37तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.

सध्या निवडलेले:

यिर्मया 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन