YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:1-12

शास्ते 6:1-12 MARVBSI

इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले; तेव्हा परमेश्वराने त्यांना सात वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत; आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्राएलात अन्न, शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे वगैरे काहीएक उरू देत नसत. कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत. मिद्यानामुळे इस्राएलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. मिद्यानाच्या जाचामुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने इस्राएल लोकांकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हांला बाहेर आणले; मिसर्‍यांच्या आणि जे कोणी तुम्हांला गांजत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हांला सोडवले आणि त्यांना तुमच्यापुढून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हांला दिला; आणि मी तुम्हांला म्हणालो की, मीच तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोर्‍यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिऊ नका; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही.” मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला; त्या वेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”